+९१ ७४००१५१५३१

आमच्या बद्दल माहिती

प्रा. ना. दुं. हायस्कूल माजी विद्धार्थी कल्याण मंडळ

शाळेतील स्मृती आणि त्यातील शिकवणी जीवनातील अनमोल ठेवा असल्याचे लक्षात घेऊन, शाळेसाठी परतफेड करण्याच्या अभिलाषेतून, २६ जानेवारी १९९८ रोजी मोजक्या समर्पित विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रा. नामदेराव दुंडगेकर हायस्कूल माजी विद्यार्थी कल्याण मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या माध्यमातून शाळेच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या मंडळाने शाळेसाठी योगदान देण्याची तळमळ कायम ठेवून, शैक्षणिक सुधारणा साध्य करण्याचे वचन घेतले आहे. आम्ही आपल्या शाळेच्या वारशाला पुढे घेऊन जाण्यासाठी सदैव तत्पर आहोत.
प्रा. नामदेराव दुंडगेकर हायस्कूल माजी विद्यार्थी कल्याण मंडळाचे ध्येय आहे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शाळेच्या शैक्षणिक दर्जाला उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबविणे. शाळेविषयी आणि शिक्षकांविषयी प्रेम असणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र आणणे, त्यांना करिअर मार्गदर्शन प्रदान करणे, क्रीडा क्षेत्रात सहभाग वाढवणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना सहाय्य देणे, आणि माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. माजी विद्यार्थ्यांची संघटित शक्ती आणि अनुभवांचा उपयोग करून शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात योगदान देणे हे आमचे ध्येय आहे.
प्रा. नामदेराव दुंडगेकर हायस्कूल माजी विद्यार्थी कल्याण मंडळाचा दृष्टीकोन आहे, शाळेच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या आर्थिक व शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रगत सुविधा निर्माण करणे. कायदेशीर नोंदणीच्या माध्यमातून संघटनेला मजबूत आधार देणे, शाळेला डिजिटल युगाशी सुसंगत करणे, आणि पतपेढीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, ‘पुस्तकाने मस्तके सुधारतात’ या विचारानुसार अद्ययावत ग्रंथालय आणि अभ्यासिका स्थापन करून, तसेच लांब गावच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी सोयी-सुविधा निर्माण करून, आम्ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला आधार देणार आहोत.

प्रा. नामदेवराव दुंडगेकर हायस्कूल (मलतवाडी)

प्राध्यापक नामदेवराव दुंडगेकर हायस्कूलची स्थापना १९८५ साली मलतवाडी येथे झाली. शाळेने १९८५ मध्ये इयत्ता आठवीचा पहिला वर्ग सुरू केला. त्यानंतर, १९८६ साली आठवी आणि नववीचे दोन वर्ग चालू करण्यात आले. १९८७ साली इयत्ता आठवी, नववी, आणि दहावीचे तीन वर्ग सुरू करण्यात आले आणि त्या वर्षी हायस्कूलने खऱ्या अर्थाने माध्यमिक शाळेचा आकार घेतला.

१९८७-८८ मध्ये या शाळेची पहिली दहावीची बॅच पास होऊन बाहेर पडली. तेव्हापासून २०२४ पर्यंत सतत ३६ बॅचेस इयत्ता दहावीच्या परीक्षा देऊन बाहेर पडल्या आहेत. सुरुवातीच्या प्रत्येक बॅचमध्ये सरासरी २५ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी धरल्यास अंदाजे ९०० मुले आणि मुली या शाळेतून बाहेर पडले आहेत.

द किणी कर्यात शिक्षण संस्थेचे मलतवाडी हायस्कूल हे "ज्ञान, विज्ञान, आणि सुसंस्कार" हे ब्रीदवाक्य घेत अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण प्रदान करत आहे आणि त्यांना घडवत आहे.

प्रा. नामदेवराव दुंडगेकर हायस्कूल माजी विद्यार्थी कल्याण मंडळाची स्थापना

२६ जानेवारी १९९८ रोजी प्राध्यापक नामदेवराव दुंडगेकर हायस्कूल, मलतवाडीच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचा उगम २५ जानेवारी १९९८ रोजी संध्याकाळी, डिलाईल रोड येथील ग्रामस्थ मंडळ १७/५५ आणि १७/५७ या दोन खोल्यांमध्ये गप्पा मारत बसलेल्या काही विद्यार्थ्यांमध्ये झाला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या शाळेसाठी काही करावे, अशी इच्छा व्यक्त केली. मुंबईत माजी विद्यार्थी संघटनांचे विद्यार्थ्यांसाठी होणारे प्रयत्न पाहून त्यांना प्रेरणा मिळाली होती.

  • शाळेविषयी आणि शिक्षकांविषयी प्रेम आणि आपुलकी असणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांच्यात शैक्षणिक आणि नैतिक मूल्यांची वृद्धी करणे.
  • विद्यार्थ्यांना विविध करिअर पर्यायांच्या दिशेने योग्य मार्गदर्शन आणि माहिती प्रदान करण्यासाठी उपक्रम राबविणे.
  • विद्यार्थ्यांचा क्रीडा क्षेत्रात सहभाग वाढविण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना देणे.
  • हुशार, होतकरू परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सहाय्य आणि प्रोत्साहन देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल करणे.
  • शैक्षणिक दर्जा उत्तम राखण्यासाठी आधुनिक शिक्षण पद्धती आणि साधनसंपत्तीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण प्रदान करणे.
  • विविध क्षेत्रात विशेष यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल करणाऱ्या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सन्मान विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून करणे.
  • माजी विद्यार्थी कल्याण मंडळाच्या सभासदांच्या संघटित शक्तीचा उपयोग करून सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात योगदान देणे.

माजी विद्यार्थी कल्याण मंडळाने आजतागायत अनेक गोष्टींवर काम केले आहे

  • बक्षीस वितरण: माजी विद्यार्थी कल्याण मंडळ स्थापन झाल्यानंतर दरवर्षी नियमितपणे विद्यार्थ्यांना विविध बक्षीसांचे वितरण केले जाते. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देतो.
  • शाळेच्या गेटचे बांधकाम: हायस्कूल समोरच्या बाजूला गेट नव्हते; मंडळाने या गेटच्या बांधकामाचा संपूर्ण आर्थिक भार उचलला आहे, ज्यामुळे शाळेचा प्रवेश अधिक सुरक्षित झाला आहे.
  • अभ्यासिके साठी इन्व्हर्टर: प्रारंभिक काळात विजेची सुविधा उपलब्ध नसताना मंडळाने रात्रीच्या अभ्यासिके साठी इन्व्हर्टर प्रदान करून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात मदत केली आहे.
  • ग्रंथालय आणि प्रयोगशाळा: मंडळाने हायस्कूलच्या वाचनालयासाठी अनेक पुस्तकांची देणगी दिली आणि ग्रंथालय व प्रयोगशाळा यांचे फर्निचर पुरवले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक साधनसंपत्ती मिळाली आहे.
  • क्रीडा साहित्य: विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी हायस्कूलला आवश्यक क्रीडा साहित्य पुरवून मदत केली आहे.
  • संस्था नोंदणी: दि. २४ ऑक्टोबर २०१७ रोजी, संस्था नोंदणी अधिनियम १८६० (१८६० चा अधिनियम २१) अन्वये माजी विद्यार्थी कल्याण मंडळाची रीतसर नोंदणी करण्यात आली आहे, ज्यामुळे संघटनेला कायदेशीर मान्यता मिळाली आहे.
  • स्नेह मेळावा आणि स्नेहभोजन: दि. १५ मे २०२२ रोजी, १९८८ पासून ते २०२२ पर्यंत हायस्कूलमधून बाहेर पडलेल्या ३४ बॅचचा आणि आजी-माजी शिक्षकांचा भव्य दिव्य स्नेह मेळावा आणि स्नेहभोजनाचे आयोजन केले.
  • पत्राशेड बांधणी: मंडळाने हायस्कूलच्या इमारतीवरील पत्राशेड बांधून दिले आहे, तसेच दुरुस्ती करून दिली आहे.
  • प्राथमिक शिक्षण सुधारणा: गावातील माध्यमिक शिक्षण दर्जेदार होण्यासाठी प्राथमिक शिक्षण चांगले व्हावे यासाठी व्हलवली प्राथमिक शाळेकडे लक्ष घालून सुधारणा करण्याचा मानस आहे.
  • गावाचा विकास: माजी विद्यार्थी कल्याण मंडळाने आज पर्यंत प्रसंगानुरूप तथा गावच्या विकासासाठी सदैव तत्पर राहून सहभाग घेतला आहे.